संस्थेची उद्दिष्ट्ये

Image

“अमर्याद, मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धूली कण
अलंकारण्याला परी पाय तुझे,
धुळीचेच आहे मला भूषण’’

प्रकाशपूजक, प्रतिभासूर्य कवी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर, आपले तात्यासाहेब यांच्या भावस्मृतीस वंदन !


भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना आदरणीय कुसुमाग्रजांनी माय मराठीची गाथा सांगता सांगता व्यथा व अवस्था यावर प्रकाश झोत टाकला. पुढे त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. इतर भाषांविषयी आदर बाळगताना मातृभाषेचा अभिमानाने स्वीकार केल्यास समाजमन अधिक सुदृढ, सृजनशील व कणखर होते, या विचारास त्यांनी अधोरेखीत केले. या विचारांनी प्रेरीत होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनमानसात, कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी “कुसुमाग्रज मराठी विचार मंच’’ची स्थापना करण्यात आली आहे.

संस्थेची उद्दिष्ट्ये

  • कथामाला- गावा-गावात, प्रत्येक शाळेत कथा माला सुरू करून त्याद्वारे कथाकथन, व्याख्याने, विज्ञान माहितीपट, चित्रपट, साहसपट, प्रदर्शने, विविध स्पर्धांचे आयोजन करणे. त्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच शासन व विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेणे.
  • बालपणापासून मुलांची मराठीशी गट्टी व्हावी, निसर्गाशी जवळीक व्हावी, यासाठी बडबड गीते, बालगीते यांचे व्हिडीओ बनवून प्रसारित करणे.
  • मराठी भाषा प्रेम वृध्दीसाठी व माणसास उभारी देण्यासाठी साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणणे. यासाठी विविध समविचारी व समउद्देशीय संस्था, व्यक्तींचे सहकार्य घेणे.
  • मराठी व भाषा भगिनींमधील संबंध दृढ करण्यासाठी या भाषांमधील साहित्यिक व सांस्कृतिक संस्थामध्ये समन्वय साधून कार्य करणे.
  • मुलांमधील कलागुण संवर्धनासाठी विविध स्पर्धा घेणे, कार्यशाळा घेणे, त्यातील कलावंतांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शने आयोजित करणे व यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून घेणे.
  • संस्थेच्या संकेतस्थळाद्वारे देशी, विदेशी अनेकविध भाषांमध्ये कुसुमाग्रज व्यक्ती व साहित्य परिचय प्रकाशित करण्यात येईल.
  • मराठी ‘ऑनलाईन परिक्षा’- विविध स्तरांवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच खुल्या ऑनलाईन परिक्षा- तज्ञांच्या सहाय्याने अभ्यासक्रम बनवून घेणे.
  • मराठीच्या शिक्षकांसाठी गुणवत्तावृध्दी कार्यशाळा व मार्गदर्शक चर्चासत्र स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षण संस्थांच्या मदतीने प्रशिक्षित, अनुभवी तज्ञांच्या सहाय्याने आयोजित करणे.
  • कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकरांचे व इतर निवडक साहित्य देशी-विदेशी भाषांमध्ये भाषांतरीत करणे व इतर भाषेतील साहित्य मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी अधिकार प्राप्त प्रकाशकांच्या सहाय्याने प्रकाशित करणे.
  • कुसुमाग्रजांविषयी नवीन पुस्तके प्रकाशित करण्यास प्रोत्साहन देणे.
  • जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या लंडन मध्ये असलेल्या ‘ग्लोब थिएटर’च्या धर्तीवर नाशिकमध्ये एक ‘अक्षय नाट्यगृह’ उभारून तिथे वि.वा. शिरवाडकर व वसंत कानेटकरांच्या नाटकांचे प्रयोग नियमित सादर करणे. ज्यायोगे नाशिक एक जागतिक दर्जाचे सांस्कृतिक केंद्र होईल.

अर्थात या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता लागेल. यातील काही कामांची तत्काळ सुरूवात करून इतर कामांचे नियोजन, आराखडा तयार करणे व त्या पुर्णत्वास नेण्यासाठी काही काळ लागले. त्यासाठी अवधी निश्‍चित करणे. देश-विदेशातील मराठी बांधव, मराठी प्रेमी संस्था, शासन यांच्या सहाय्याने निधी उभारला जाईल. आपले ही या कामी मोलाचे सहकार्य अपेक्षित आहे.

%d bloggers like this: