पहिली अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद नाशिकमध्ये

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ साज मिळाला खरा, परंतु, राजभाषा, लोकभाषा, ज्ञानभाषा, व्यवहारभाषा अलंकार प्राप्त होणे आवश्यक आहे. सजग, स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी, संस्कृती रक्षण आणि अस्मिता संगोपनासाठी आपल्या मराठी मातृभाषेच्या पदराचे कवच आवश्यक आहे. परभाषा, परसंस्कृती या पुतना मावशीच्या जोखडातून सुटका करवून, शूर स्वअस्तीत्वाने झळाळणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आणि एकूणच मराठी भाषेच्या विविधांगी अभ्यास व्हावा, यावर सखोल विचारमंथन व्हावे म्हणून, नाशिक येथे कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या पुढाकाराने ‘अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद’ आयोजित करण्यात आलेली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने या परिषदेसाठी बहुमुल्य सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. या परिषदेसाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांनी सांगितले.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृह आणि मॅनेजमेंट कॉलेजच्या प्रांगणामध्ये शनिवार दिनांक  ९ आणि रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी या पहिल्या वहिल्या मराठी भाषा-संस्कृती परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दोन दिवसीय परिषदेमध्ये विद्वत विचारवंत, समाजहितैषी, मराठी भाषा अभ्यासक, तत्त्ववेत्ते यांच्या वैचारिक घुसळणाने मराठी भाषा विषयक समाज जागृतीचे नवनीत काढण्याचा प्रयत्न होणार आहे. या परिषदेसाठी तमाम मराठी भाषा प्रेमींचे सहकार्य सर्वार्थाने व्हावे अशी अपेक्षा कुसुमाग्रज मराठी विचारमंचचे अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस तसेच मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातील मराठी भाषेचे अभ्यासक, विचारवंत आणि मराठी भाषेचा आग्रह धरणारे आणि नाशिक जिल्ह्यातील मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सहभाग असणार आहे. याबाबत अनेक मान्यवरांशी बोलणे झाले असून काही विचारवंतांशी बोलणे सुरु असून लवकरच कार्यक्रम पत्रिकेला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

परिषदेच्या उद्घाटनास राज्याचे मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, सांस्कृतिक मंत्री, शालेय शिक्षणमंत्री तसेच उच्चशिक्षणमंत्री यांना आमंत्रित केले जाणार असून मराठी भाषेविषयी कळकळ असणाऱ्या विविध राजकीय पक्षातील मान्यवर अभ्यासकांनासुध्दा आमंत्रित केले जाणार आहे.

          या परिषदेमध्ये विविध विषयांवर जसे की, मराठीच्या अवनतीची कारणे, मराठी आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकास उन्नतीच्या संधीची भाषा कधी होणार?, मराठीच्या उन्न्ततीसाठी शासनाची भूमिका, मराठी माध्यमातून शिक्षण आवश्यक का आहे?, विभागीय साहित्य संस्था आणि मराठी भाषा, मराठीच्या उपाययोजनाच्या क्षेत्रांची सद्यस्थिती, बृहन्महाराष्ट्रातील मराठी समाज आणि वास्तव, विदेशातील मराठी, मराठी आणि इतर भाषांचा समन्वय आणि अनुवाद, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात मराठी विषय का नाही? आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा, मराठी सक्तीचा कायदा आणि त्याच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती, माध्यमांमधील मराठी, मराठी भाषिकांची मराठी बाबतची उदासीनता, मराठीसाठी काय करावे? भाषाविज्ञान हा विषय उपेक्षित का आहे?, साहित्यकेंद्री शिक्षणाऐवजी भाषाकेंद्री शिक्षणाची भाषा शिक्षणाची गरज, संस्कृतीची बदलती संकल्पना, भाषा आणि संस्कृती – संबंध, संस्कृती आणि लोकसंस्कृती, मराठी भाषा आणि बृहन्महाराष्ट्रातील संस्कृती, धर्म आणि संस्कृती परस्परसंबंध, या आणि अशा अनेक विषयांवर चर्चा सत्र, गटचर्चा, परिसंवाद, व्याख्याने तसेच मराठी संस्कृतीविषयक विविध कार्यक्रम, कवी संमेलन आयोजित करण्यात येणार असून. या भाषेच्या घुसळणातून निघणारे तथ्य ग्रंथरूपाने प्रसिद्ध करून एक महत्वाचा दस्तऐवज या आणि यापुढील पिढीतील मराठी भाषा अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कुसुमाग्रज मराठी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

          कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या माध्यमातून इयत्ता चौथी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी आणि त्यांनी खास करून मराठी वाचावे यासाठी तयार केलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला ‘मराठीचे उपासक’ असे प्रशस्तीपत्र देण्यात येते. जानेवारी २०२५ पासून अकरा हजार विद्यार्थ्याना उपासक पदवी प्रदान करण्यात आलेली असून या शैक्षणिक वर्षामध्ये तीन लाख मराठीचे उपासक तयार करण्याचा मानस आहे. मराठी भाषा विषयक ठोस कार्यक्रम म्हणून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून ही परिषद याच उपक्रमाचा पुढचा टप्पा आहे. असे विविध उपक्रम नियमितपणे करण्याचा प्रयत्न सुरूच राहणार आहेत.           लवकरच परिषदेचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष तसेच उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठरविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती वेळोवेळी प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष सतीश बोरा आणि सरचिटणीस सुभाष सबनीस यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे तसेच संस्थेचे अनेक कार्यकारिणी सदस्य, कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे  उपाध्यक्ष दिलीप बारवकर, आनंद देशपांडे,जयप्रकाश मुथा, शिरीष देशपांडे, नंदकिशोर ठोंबरे उपस्थित होते.