पेठ तालुक्यातील चिमूकल्यांना मदतीचा हात !

नाशिक- जेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विभुषित वि.वा. शिरवाडकर तथा कुसूमाग्रज यांचे विचार ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर पोहचवण्यासाठी स्थापन केलेल्या कुसूमाग्रज मराठी विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील ५०० शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कुसूमाग्रज मराठी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सतीश बोरा यांचे उपस्थितीत पेठ तालुक्यातील धोंडमाळ,खडकाचापाडा, खंबाळे, गढईपाडा, कापूरझिरा येथील ५०० विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेले वह्या, पेन्सील सेट, रंगपेटी, अक्षरपाटी आदी शैक्षणिक साहित्य व बॅग वाटप करण्यात आली. तसेच सुभाषचंद छाजेड (विजय क्लाॅथ सेंटर, पिंपळगाव बसवंत)व सौ.रेखा कांकरिया, परभणी यांच्या सामाजिक दायित्वातून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
कविवर्य कुसुमाग्रज यांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन मराठी विचार मंचने ग्रामीण भागात सुरू केलेले कार्य कौतुकास्पद असून यामूळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे रामदास शिंदे यांनी प्रास्तविकात नमूद केले. मराठी ही आपली मातृभाषा असून मराठी भाषा समृध्द करण्यासाठी कुसुमाग्रजांचे साहित्य वाचन करून त्यांचा आदर्श दैनंदिन आचरणात आणल्यास सुसंस्कृत पिढी तयार होईल असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष सतीश बोरा यांनी केले. विश्वस्त जयप्रकाश मुथा यांनी स्पर्धात्मक युगात इंग्रजीचे आवाहने पेलतांना मराठी भाषेलाही तितकेच महत्व देण्याचे आवाहन केले.

 याप्रसंगी कुसूमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, विश्वस्त जयप्रकाश मुथा, जीवन बोरा, वैशाली नेहे, ललित शिंगाडे, रामदास शिंदे, सहादू चौधरी, सुनिल आहिरे, गणू राऊत, प्रकाश चौधरी, अनिता शिंदे, रविंद्र दरोडे यांचे सह ग्रामस्थ,शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. रामदास शिंदे यांनी प्रास्तविक तर सुनिल आहिरे यांनी सुत्रसंचलन व आभार मानले.

%d bloggers like this: