कुसुमाग्रज विचार मंच या संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या पाच सहा वर्षामध्ये संस्थेच्यावतीने मराठी भाषा या विषयावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागातील विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गेले पाच वर्षे पेठ तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमध्ये मराठी भाषेचे विविध पुस्तके तसेच शालेय साहित्याचे आणि कपड्यांचे वाटप करणे, निबंध स्पर्धा, काव्यस्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन या सर्व विद्यार्थ्याना वाचनाविषयी आणि सोबतच मराठी भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विचारांनी प्रेरित होवून कुसुमाग्रज विचार मंच या संस्थेची स्थापन करण्यात आलेली आहे. स्व.तात्यांना आदिवासी भागातील विद्यार्थ्यांप्रती असलेल प्रेम आणि मदतीची भावना कुसुमाग्रज विचार मंच पुढे चालवीत आहे.
संस्थेच्यावतीने २०२४ या वर्षापासून मराठी भाषा या विषयावर हिंदी भाषेच्या ज्या प्रमाणे विविध परीक्षा घेतल्या जातात त्या प्रमाणे मराठी भाषेच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केलेली आहे. प्रथम परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याला ‘मराठी भाषा उपासक’ म्हणून पदवी देण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर, तसेच त्यांच्या जीवनावर आधारित माहितीची एक पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका विद्यार्थ्याना अभ्यासासाठी दिली जाते आणि त्यावर आधारित शंभर गुणांची प्रश्नपत्रिका तयार करून त्यावर लेखी परीक्षा घेतली जाते. अशी पहिली परीक्षा नुकतीच पार पडली असून पंचावटीमधील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, पंचवटी प्राथमिक विद्यालय, नवचेतना विद्यालय, पंचवटी माध्यमिक विद्यालय या चार विद्यालयातील चारशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदविला आहे. अशी परीक्षा महाराष्ट्रामधील सर्व शाळांमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध संस्थांशी संपर्क सुरु असून २०२५ अखेर तीन लाख मराठी भाषा उपासक तयार करण्याचे प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्याबरोबर मराठी भाषा प्रचार आणि प्रसार यासाठी विविध उपक्रम राज्यातील विविध शाळां, महाविद्यालायांमध्ये राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून त्यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर पुढील वर्षभर राबविण्यात येणार आहेत. सर्वसामान्य पालकांचा इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा अट्टाहास पहाता मराठी भाषेकडे दुर्लक्ष होवू नये तसेच या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यावर मराठी भाषेचे संस्कार व्हावे म्हणून कुसुमाग्रज मराठी विचार मंचने यासारखे उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या परीक्षेमध्ये अमराठी भाषिकांनी सुध्दा सहभाग नोंदवावा यासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्राबाहेरील इच्छुकांना सोयीचे व्हावे म्हणून हि परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यासाठीच्या तांत्रिक बाबींवर काम सुरु असून लवकरच हि परीक्षा ऑनलाईन स्वरूपात देता येणार आहे. या परीक्षा उपासक, पारंगत आणि प्राज्ञ अशा तीन टप्यात घेण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांसाठी मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या विविध संस्था, एन.जी.ओ. तसेच वैयक्तिक स्वरूपात शारीरिक, बौद्धिक आर्थिक याव्यतिरिक ज्या ज्या स्वरूपात मदत करता येईल तशी मदत करण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे. संस्थेच्या विविध उपक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष आनंद देशपांडे, श्रीधर व्यवहारे, सदस्य शिरीष देशपांडे, डॉ नागेश कांबळे, श्याम पाडेकर, दिलीप बारावकर, सुहासिनी वाघमारे, सुमती पवार, तसेच या परीक्षेचे समन्वयक सौ अलका कुलकर्णी, अंजना भंडारी, आरती डिंगोरे, नंदकिशोर ठोंबरे, दिगंबर काकड आणि रामदास शिंदे हे सर्व मेहनत घेत आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये संस्थेचे अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस, कोशाध्यक्ष जयप्रकाश मुथा आणि समन्वयक दिगंबर काकड यांनी दिली आहे