नमस्कार
संस्थेतर्फे ऑनलाईन दिवाळी अंक.
मराठी साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक मराठी तसेच अमराठी रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहेत आणि ही परंपरा डिजीटल युगात सुद्धा खंडीत झालेली नाही हे नमुद करणे आवश्यक आहे. अर्थात, बदलत्या काळानुसार आणि वाचकांच्या मागणीनुसार सादरीकरणाची पद्धत काही अंशी बदलली असली तरी अनेक संकेतस्थळांनी ऑनलाईन दिवाळी अंकांची सुरवात करुन बदलत्या काळानुसार वाचकांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. याचमुळे, अनेक छापील स्वरुपातील दिवाळी अंक सुद्धा आपली आवृत्ती पीडीएफ अथवा तत्सम स्वरुपात वाचकांना उपलब्ध करुन देत आहेत.
कुसुमाग्रज मराठी विचार मंच, या संस्थेची स्थापना मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार व्हावा, मराठी भाषेविषयी लोकांमधे आपुलकी रहावी, तसेच वॄद्धींगत व्हावी या उद्देशाने झालेली आहे. स्थापनेपासून संस्थेच्या मार्फत हा विचार आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेकविध उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून, संस्थेतर्फे ऑनलाईन दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करण्याचा मानस आहे.
सध्या जगभरात करोनाची साथ चालू आहेच, त्याच सोबत सध्या महाराष्ट्रामधे महापूराने थैमान घातले आहे. निसर्ग सर्व बाजूंनी असहकार करत आहे, अशा संकटांच्या काळात मनुष्याला सकारात्मक रहाण्यासाठी, आलेल्या संकटांशी झुंजण्यासाठी, मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी साहित्य महत्वाची भुमिका बजावत असते. साहित्य त्याच्या थकलेल्या मनाला विरंगुळा देतेच देते पण त्यासोबत हे ही दिवस जातील आणि पुन्हा ताठ कण्याने उभे रहाण्याची आशा आणि इच्छा जागृत करुन संकटकाळात धीर आणि दिलासा देते.
याच उद्देशाने कुसुमाग्रज मराठी विचार मंचाने दिवाळी २०२१ विशेषांक प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे.
मध्यवर्ती विषय
या विशेषांकाचा मध्यवर्ती विषय १) मराठीचे इंग्रजीकरण की इंग्रजीचे मराठीकरण? तुलनात्मक अभ्यास आणि २) शुद्ध भाषा, प्रमाण भाषा की बोली भाषा? महत्व कशाला द्यायचे असे असून यासंदर्भातील आपले स्वतंत्र विचार, चिंतन, मनन, संदर्भ इत्यादी आपण लेख स्वरुपात पाठवावेत.
अर्थात, मध्यवर्ती विषयाखेरीज इतर विषय हाताळणारे दर्जेदार लेख, कविता, ललित, समीक्षा सुद्धा या दिवाळी अंकामधे समाविष्ट करण्यासाठी पाठवू शकता. अट एकच आहे की सदर लेखन हे आपण स्वत: केलेले असावे, आधी कुठेही प्रसिद्ध झालेले नसावे, अगदी तुमच्या स्वत:च्या ब्लॉग अथवा सोशल साईटवर सुद्धा. आपले लेखन दुसर्या कुठल्याही साहित्यावर आधारीत असल्यास तसा स्पष्ट उल्लेख असावा. लेखासोबत छायाचित्रे द्यायची असल्यास आपण स्वत: काढलेली अथवा प्रताधिकार मुक्त असलेलीच छायाचित्रे दिली जावीत. लेखन केवळ मराठी भाषेत असावे. एका व्यक्तीचा एकच लेख स्विकारला जाईल. लेखन स्विकारण्याचा अगर नाकारण्याचा अधिकार संपादकांचा आहे.
आपले लेखन दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यत diwali2021@kusumagrajmvm.org या इमेल पत्त्यावर पाठवावे.
काही अडचण असल्यास अथवा खुलासा आवश्यक असल्यास याच इमेलवर संपर्क साधावा.
दिवाळी अंक ऑक्टोबर २०२१ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ऑनलाईन प्रसिद्ध होईल.
आपला लेख मराठी युनिकोड फॉंटचा वापर करुन मायक्रोसॉफ्ट वर्ड (MS Word) मधे टंकून डॉक/डॉक्स (Doc/Docx) मधे पाठवावा.
छायाचित्रे स्वतंत्रपणे जोडावीत. आपले नाव, पत्ता, इमेल पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक व्यवस्थित द्यावा.
लेखासाठी १५०० ते २५०० शब्द अपेक्षित आहेत.
काही उत्तम आणि निवडक लेखांना संस्थेतर्फे मानधन दिले जाईल. तसेच, आपले लेखन या दिवाळी अंकात समाविष्ट न झाल्यास, पुढे निघणा-या विशेषांकात समाविष्ट केले जाऊ शकते याची नोंद घ्यावी. दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्याबरोबर लगेचच आपले लेखन इतरत्र (अगदी स्वत:च्या ब्लॉग/सोशल साईटवर) प्रसिद्ध करु नये ही विनंती आणि अपेक्षा. साधारण, ९० दिवसांनंतर प्रसिद्ध केल्यास, आणि सोबत मुळ लेखनाची लिंक दिल्यास हरकत नाही.
तर आता वाट कसली पहाता? करा लेखनाला सुरवात आणि लवकरात लवकर आम्हाला पाठवा !
आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत आपल्या लेखनाची !!